Red Fort Blast: दिल्ली तील लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक तपशीलांनुसार, सायंकाळी अंदाजे पावणे सातच्या सुमारास एका उभ्या कारमध्ये अचानक प्रचंड आवाजासह स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील काही इमारतींच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे, स्फोट झालेल्या कारच्या बाजूला उभ्या असलेल्या आणखी तीन वाहनांना देखील आग लागल्याचे दिसले. घटनास्थळी काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
A call was received regarding an explosion in a car near Gate No. 1 of the Red Fort Metro Station, after which three to four vehicles also caught fire and sustained damage: Delhi Fire Department. — ANI (@ANI) November 10, 2025
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नं. १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीचा कॉल दिल्ली अग्निशमन विभागाला प्राप्त झाला. स्फोटानंतर आगीचा फैलाव इतका वेगात झाला की शेजारी पार्क केलेल्या आणखी तीन ते चार कारही जळण्याच्या विळख्यात सापडल्या. या वाहनांनाही मोठे नुकसान झाले आहे.घटनेची गंभीरता लक्षात घेऊन एकूण सात फायर टेंडर्स घटनास्थळी रवाना करण्यात आले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि अधिकृत तपशीलांची प्रतीक्षा सुरू आहे.
या स्फोटानंतर केंद्र सरकारच्या स्तरावरही जलद हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिस आयुक्तांशी तातडीने संवाद साधला. त्यानंतर एनएसजी, एनआयए आणि फॉरेन्सिक विभागाच्या विशेष टीम्सना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. गृहमंत्री सतत आयबी डायरेक्टरशी संपर्कात राहून परिस्थितीचे अपडेट घेत आहेत.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची थेट माहिती घेतली. पंतप्रधानांनी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधत घटनेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेतली असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. सरकारकडून याप्रकरणी उच्च पातळीवर मॉनिटरिंग सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
#WATCH | A call was received regarding an explosion in a car near Gate No. 1 of the Red Fort Metro Station, after which three to four vehicles also caught fire and sustained damage. A total of 7 fire tenders have reached the spot. A team from the Delhi Police Special Cell has… pic.twitter.com/Fg7117XPty — ANI (@ANI) November 10, 2025
स्फोटानंतर जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या घटनेत जखमी झालेल्या अनेक व्यक्तींना LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात सतत जखमींना आणले जात असल्याची माहिती स्रोतांकडून मिळत आहे. सध्या जखमींची नेमकी संख्या किती आहे हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले तरी जखमींची संख्या कमी नसल्याचे संकेत आहेत. या घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा आणि सुरक्षा विभाग उच्च सतर्क मोडवर असून पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी या स्फोटाचे भीषण स्वरूप वर्णन करताना धक्कादायक माहिती दिली आहे. काही जणांच्या म्हणण्यानुसार स्फोटानंतर रस्त्यावरच शरीराचे काही अवयव विखुरलेले दिसले. आजूबाजूच्या अनेक कारचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने सूत्रांना सांगितले की, ‘रस्त्यावर हात पडलेला पाहून आम्ही थक्क झालो. हे कसं घडलं याचा काहीच अंदाजच येत नव्हता.’ एका दुकानदाराने सांगितले की, ‘इतका मोठा आवाज आयुष्यात कधीच ऐकला नव्हता. स्फोटाच्या धक्क्याने मी तीन वेळा पडले. त्या क्षणी खरंच वाटलं की आपण सगळे मरणार.’ दरम्यान, स्फोटाच्या ज्वाळा घरातूनच दिसल्याने खाली येऊन परिस्थिती पाहिल्याचे एका रहिवाशाने सांगितले. ‘मोठा आवाज झाला आणि लगेचच धूर व ज्वाळा दिसल्या,’ असे स्थानिक रहिवाश्यानी सांगितले.
या स्फोटाबाबत अग्निशमन विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी ए. के. मलिक यांनी सांगितले की, ‘चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली आणि सात अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.’ त्यांनी पुढे सांगितले की, संध्याकाळी ७:२९ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. स्फोटाचे कारण आणि नेमकी परिस्थिती काय होती याबाबत अजूनही तपास सुरू आहे.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort | Deputy Chief Fire Officer AK Malik says, "We got information that there was a blast in a car near Chandni Chowk Metro Station. We responded immediately, and seven units were sent to the spot. At 7:29 PM, the fire was brought under control.… pic.twitter.com/lhSAPPRP5m — ANI (@ANI) November 10, 2025
या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून जखमींची संख्या 24 वर पोहोचली आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि इतर महत्वाच्या शहरी भागांमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. स्फोटाचे अचूक स्वरूप, वापरलेली सामग्री आणि हेतू काय होता हे निष्पन्न करण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम दाखल झाली असून जळालेल्या वाहनांचे सॅम्पल, धातूचे अवशेष आणि इतर पुरावे गोळा करून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्लू मिळवण्याचे काम सुरू आहे.