महाराष्ट्र दिनापासून राज्यातील व्यावसायिक वाहनचालकांसाठी मोठा नियम लागू होणार आहे. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर तसेच ई-बाईक टॅक्सी चालकांना आता मराठीत संवाद साधणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत स्पष्ट घोषणा करत १ मे २०२६ पासून नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे सांगितले.पिंपरी-चिंचवड येथे दौऱ्यावर असताना सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांनी वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठी भाषेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रवासी मराठीत बोलतात, मात्र चालकांना भाषा समजत नसल्याने वाद निर्माण होतात. अनेकदा किरकोळ वाद वाढून पोलिसांत तक्रारी दाखल होतात. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील हा नियम नवीन नसून 1989 पासून त्यासंदर्भातील तरतूद अस्तित्वात असल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडेच या नियमात काही सुधारणा करण्यात आल्या असून आता त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक चालकांना मराठी शिकणे आवश्यक ठरणार आहे.
राज्यात स्थलांतरित चालकांमध्ये परवाना रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात असताना सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला. 1 मेपासून कारवाई निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.सरकारकडून चालकांना मराठी शिकवण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. भाषातज्ज्ञांच्या मदतीने मराठी शिकण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली असून ती चालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी बोलणे, समजणे आणि प्रवाशांशी सुसंवाद साधणे यासाठी प्रशिक्षणाचीही तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल तर मराठीचा स्वीकार करावा लागेल. मराठी ही केवळ भाषा नसून राज्याची ओळख आणि संस्कृती आहे. त्यामुळे नागरिकांशी व्यवहार करताना चालकांना मराठी येणे आवश्यक आहे.