Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे. कुणबी नोंदी, जात वैधता प्रमाणपत्रे आणि मराठा समाजावर होणाऱ्या कथित अन्यायावरून त्यांनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, "सध्या मराठा समाजाची अडवणूक केली जात असून आता शासनाविरोधात प्रचंड मोठी लाट उसळणार आहे," असा स्पष्ट इशारा दिला.
'शासनानेच शोधलेल्या नोंदी रद्द करणे अयोग्य
काही भागात मराठा बांधवांना कुणबी दाखले दिल्यानंतर जात पडताळणी दरम्यान त्यांचे अर्ज फेटाळले जात असल्याच्या प्रकारावर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "कुणबी नोंदी स्वतः सरकारनेच शोधून काढल्या आणि दाखलेही दिले. आता तेच प्रमाणपत्र अवैध ठरवले जात आहे. यामागे प्रचंड राजकीय हेवेदावे सुरू असून राजकीय समीकरणांपेक्षा मला मराठा समाजाच्या होत असलेल्या नुकसानाची जास्त काळजी आहे," असे जरांगे म्हणाले.
शासकीय दबावाचा आरोप आणि पुढील रणनिती
जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांच्या रद्द झालेल्या कुणबी प्रमाणपत्राचा उल्लेख करत जरांगे यांनी विचारले की, "रक्ताचे नातेसंबंध असलेल्या नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार सरकारला कसा काय असू शकतो? इतर ओबीसींची प्रमाणपत्रे सहसा रद्द होत नाहीत, मग केवळ मराठा समाजावरच हा अन्याय का?" राजकीय नेते अधिकाऱ्यांवर दबाव आणून या नोंदी रद्द करण्यास भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणांची सविस्तर माहिती मागवली असून कशाच्या आधारे नोंदी फेटाळल्या गेल्याचा अभ्यास करून पुढील ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.