Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; सर्व खाती काढून अजित पवारांकडे हस्तांतरित

नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; सर्व खाती काढून अजित पवारांकडे हस्तांतरित

Manikrao Kokate: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या न्यायालयीन निर्णयानंतर राजकीय पातळीवरही मोठी हालचाल झाली असून कोकाटे यांच्याकडील सर्व खाती तात्काळ काढून घेण्यात आली आहेत. त्यांचा संपूर्ण कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

कोकाटे यांना यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र सत्र न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आता त्यांच्या अटकेचा धोका अधिक गडद झाला आहे.

हे प्रकरण मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांशी संबंधित आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केली होती. पुढे त्यांच्या कन्या अ‍ॅड. अंजली दिघोळे-राठोड यांनी या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

दरम्यान, न्यायालयाचा निकाल कायम राहिल्यानंतर सरकारने प्रशासकीय पातळीवर तातडीचा निर्णय घेतला आहे. कोकाटे यांच्याकडील सर्व मंत्रीपदाची खाती काढून घेऊन ती अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत, जेणेकरून विभागांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील काळात आणखी मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number