मुंबई: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र सत्र न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत खालच्या न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर अटक वॉरंट काढण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून, त्यावर तातडीने कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Ration Card Rules: स्वस्त धान्य योजनेत मोठा फेरबदल; लाखो लाभार्थ्यांवर होणार परिणाम
हे प्रकरण मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणाऱ्या सदनिकांशी संबंधित आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती, तर त्यांच्या कन्या अॅड. अंजली दिघोळे-राठोड यांनी पुढे हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
दरम्यान, या घडामोडींचा थेट परिणाम मंत्रिमंडळाच्या हालचालींवरही दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीस माणिकराव कोकाटे अनुपस्थित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात कोकाटे यांच्या खात्यांबाबत चर्चा झाल्याचेही समजते. उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली नाही, तर कोकाटेंचे मंत्रिपद अडचणीत येऊ शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.
या प्रकरणावर विरोधकांकडूनही जोरदार टीका होत आहे. आमदार रोहित पवार यांनी कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत, इतर प्रकरणांत सदस्यत्व रद्द करण्यात आले असताना कोकाटे यांना वेगळा न्याय का दिला जातो, असा सवाल केला आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेबरोबरच राजकीय वादही अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.