तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईत ममता बॅनर्जी यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली मात्र यादरम्यान त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहे. राष्ट्रगीताच्या अवमानप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीताचा अपमना होणे भयंकर असल्याचे भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘राजकीय हव्यासापोटी राष्ट्रीय प्रेम गहाण ठेवण्याचे काम ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यातून झालेले आहे. राष्ट्रगीत म्हणताना अडथळा आणणे म्हणजे गुन्हा आहे. ममता बॅनर्जी या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या. तसेच त्यांनी अर्धवट गाऊन राष्ट्रगीत थांबवले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे’, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘ममता यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे मत होईल की, राष्ट्रभिमान असलेले बाळासाहेबांचे चिरंजीव जेव्हा देशाच्या बाबतीत राष्ट्रगीताचा अपमान होत असताना केवळ राजकारणापोटी ममता बॅनर्जी यांना वाचवण्याचे काम करत आहेत.’ त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.