सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्या दोन तरुणांच्या बेदरकार गाडी चालवल्यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. हे तरुण चालवीत असलेल्या मोटरसायकलची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मोहम्मद वाडी येथील पालखी रोडवर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
तसलीम फिरोज पठाण असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी आयान शहानुर शेख आणि जाहिद जावेद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ज्योतिबा शंकर कुरळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान शेख आणि जाहीर शेख हे सोशल मीडियावर रिल्स टाकत असतात. या रील्स तयार करण्यासाठी जाहीद शेख याने दिलेल्या चीतावणीवरून आयान शेख याने त्याची मोटरसायकल जोरात चालविण्यास सुरुवात केली.
बेदरकार वाहन चालवल्यामुळे इतरांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना असताना देखील त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवली. त्याच्या दुचाकीची पठाण यांना धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी तेथून पळून गेले. पोलिसांनी दोघांचा शोध घेत आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.