CM Medical Assistance Fund: राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’द्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका आर्थिक वर्षात 1769 रुग्णांना सुमारे 14 कोटी 25 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी येणारा मोठा खर्च पेलणे कठीण असलेल्या कुटुंबांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळाला असून, अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे.
राज्यातील लाभार्थ्यांचा आकडा आणि निधीचे स्वरूप
राज्याचा विचार केल्यास, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40,776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. आरोग्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य ठरले आहे. विविध गंभीर शस्त्रक्रिया, कर्करोग आणि हृदयविकाराच्या उपचारांसाठी या निधीचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे.
पारदर्शक आणि जलद प्रक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि नामांकित रुग्णालयांसोबत केलेले सामंजस्य करार यामुळे रुग्णांना वेळेत अर्थसाहाय्य उपलब्ध होत आहे. पूर्वी या मदतीसाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता जिल्हा स्तरावरच कक्ष स्थापन झाल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे झाले आहे. यामुळे वेळेची बचत होऊन रुग्णांना तातडीने उपचार मिळणे शक्य झाले आहे.
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’द्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात १७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार… pic.twitter.com/J55WSCP22n — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 10, 2026
मदतीसाठी टोल फ्री क्रमांकाचे आवाहन
शासनाकडून गरजू रुग्णांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा अर्जाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी नागरिकांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही मदत थेट रुग्णालयांच्या खात्यात जमा होत असल्याने सर्वसामान्य जनतेने कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.