लातूर : नीट यूजी 2026 परीक्षेशी संबंधित पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) महत्त्वाची कारवाई केली आहे. लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसशी संबंधित आदित्य मोटेगावकर याच्यावर दोन वर्षांसाठी नीट परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नीट यूजी 2026 मधील त्याची उमेदवारीही रद्द करण्यात आली आहे. 3 मे 2026 रोजी देशभरात नीट यूजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या प्रकरणाने मोठी चर्चा निर्माण झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आदित्य मोटेगावकर याच्याकडे प्रश्नपत्रिका पोहोचली होती किंवा ती पुढे शेअर करण्यात आली होती का, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता.
या प्रकरणी एनटीएने 15 जुलै रोजी आदित्य मोटेगावकर याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, आदित्यने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले. तसेच आपल्या विरोधातील कारवाईसाठी कोणते पुरावे आहेत, याची माहिती देण्याची मागणी त्याने केली होती. तपासाशी संबंधित सीबीआयच्या माहितीसंदर्भातही त्याने स्पष्टीकरण मागितले होते. आता एनटीएने त्याच्याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांच्या बंदीमुळे त्याला आगामी कालावधीत नीट परीक्षेला बसता येणार नाही. शिवाय 2026 च्या परीक्षेतील त्याची उमेदवारी रद्द झाल्याने या कारवाईचा थेट परिणाम त्याच्या वैद्यकीय प्रवेशाच्या प्रक्रियेवर झाला आहे. दरम्यान, पेपरफुटीच्या आरोपांमुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत देशभरात प्रश्न उपस्थित झाले होते. एनटीएकडून संबंधित प्रकरणांमध्ये तपास आणि कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आदित्य मोटेगावकर याच्यावरील कारवाईनंतर आता या प्रकरणात पुढे कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले आहे.