सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडत असल्याचे चित्र आहे. सोलापूरात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषद उमेदवारी वरून नाराज असलेले शरद पवार गटाचे आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा सुरु आहे.
सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होणार आहे. मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याच पक्षातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या चार पैकी तीन आमदारांची उपस्थिती असल्याची माहिती आहे.
तसेच सांगोल्याचे शेकपचे आमदार बाबासाहेब देशमुख ही महायुतीच्या बैठकीत सहभागी होते. मात्र बैठकीच्या पूर्वीच माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात उभी फूट पडली असून राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा राजेंद्र राऊत यांना पाठिंबा असल्याचे समोर आले आहे.