महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 32 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाविकासआघाडीच्या एकूण 36 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
26 जणांनी कॅबिनेट तर 10 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या महाविकासआघाडी सरकारचं आपण एकूण जमेची आणि उणीवेची बाजू पाहणार आहोत.
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये मुस्लिम आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एकूण 4 मुस्लिम आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी 1 तर राष्ट्रवादीकडून 2 मुस्लिम मंत्र्यांना मंत्रिपदं दिली.
अस्लम शेख, काँग्रेस, मालाड पश्चिम
अब्दुल सत्तार, शिवसेना, सिल्लोड
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस, कागल
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस, अणुशक्तीनगर
महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण 3 महिलांना स्थान देण्यात आलं आहे. काँग्रेसकडून 2 तर राष्ट्रवादीकडून 1 महिला आमदाराला मंत्रिपद दिलं आहे.
काँग्रेसने यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना मंत्रिपदी संधी दिली आहे. तर राष्ट्रवादीने आदिती तटकरेला राज्यमंत्रिपद दिलं आहे.
शिवसेनेकडून मंत्रिमंडळात एकही महिला आमदाराला स्थान देण्यात आले नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 2 महिला आमदार निवडून आल्या.
भायखळयातून यामिनी जाधव तर चोपडा मतदारसंघातून लता सोनवणे निवडून आल्या आहेत.
आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे हे चौघे पहिल्याच झटक्यात आमदार म्हणून निवडून आले.
महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच निवडून आलेल्या या चार आमदारांना थेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
यामध्ये वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.
तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे..
महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात सोमवारी 36 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 19 आमदारांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. 19 आमदारांमध्ये ज्येष्ठ आणि नवख्यांचाही समावेश आहे.
महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ हे जम्बो मंत्रिमंडळ आहे. यातील 36 आमदारांनी सोमवारी तर 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसह 6 जणांनी शपथ घेतली होती.
त्यामुळे महाविकास आघाडीचे एकूण 43 जणांचे मेगा मंत्रिमंडळ आहे.
महाविकासाघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा दबदबा आहे. उपमुख्यमंत्रीपदासह 11 आमदारांनी कॅबिनेट तर 4 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात एकूण 16 मंत्री आहेत.
या मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाही पाहायला मिळाली. या मंत्रिंमडळात एकूण 7 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सात ही मंत्र्यांना राजकीय वारसा आहे.
राजकीय वारसा असलेले एकूण 7 मंत्र्यांची नावं
आदित्य ठाकरे
आदिती तटकरे
अमित देशमुख
वर्षा गायकवाड
विश्वजीत कदम
प्राजक्त तनपुरे
शंकरराव गडाख
राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण 12 जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील जनतेचा आणि आमदारांचा नाराजीचा सूर आहे.
महाविकासाघाडी सरकारमध्ये या जिल्ह्यांना स्थान मिळालं नाही.
सोलापूर
सिंधदुर्ग
अकोला
वाशिम
भंडारा
गोंदिया
गडचिरोली
उस्मानाबाद
हिंगोली
परभणी
पालघर
धुळे