Maharashtra Assembly Session: राज्यात पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय!, विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशनाची तयारी

काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसकडे आवश्यक ताकद असल्याचं पक्षाचं मत आहे. दिल्लीत पक्ष नेतृत्वाने सतेज पाटील यांच्या नावाला मंजुरी दिल्याची माहितीही समोर आली आहे.

Maharashtra Assembly Session: राज्यात पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय!, विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशनाची तयारी

मुंबई : राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदच एक अनोखी आणि विचार करायला भाग पडणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून सुरू व्हायला अवघा एक महिना राहिलाय, मात्र विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांत सध्या विरोधी पक्षनेता नाही! म्हणजेच, अधिवेशनाच्या वेळी सत्तेमधील सरकारला प्रश्न विचारणारा आणि सरकारला जबाबदार धरणारा प्रमुख आवाजच अनुपस्थित राहणार आहे. असा प्रसंग मागील 25 वर्षांत एकदाही घडलेला नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संविधानानुसार विरोधी पक्षनेता हे पद केवळ सत्तेचा विरोध करणारे नव्हे, तर लोकशाहीतील नियंत्रण ठेवणारे एक महत्त्वाचे पद मानले जाते. पण आज दोन्ही सभागृहांत हे पद रिक्त असल्याने, अनेक जण विचारत आहेत, या लोकशाहीत विरोधी आवाज नेमका कोण आहे?

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांचे नाव चर्चेत आले आहे. काँग्रेसनेही त्यांचा नावाला होकार दिला आहे, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. कारण काय? तर विरोधी पक्षातील सदस्यसंख्या सभागृहाच्या एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं कारण देत नियुक्ती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हे पद अद्याप रिक्त आहे.या संपूर्ण घडामोडीवर भास्कर जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “संख्याबळाचं कारण सांगून हे पद मुद्दाम रिक्त ठेवण्यात आलं आहे. कारण सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर थेट प्रहार होईल, याची भीती त्यांना वाटते.”

हेही वाचा: Ajit Pawar: अजित पवारांचा चौकशीला पाठिंबा; म्हणाले "नोंदणी अधिकाऱ्यांनी हे व्यवहार मंजूर कसे काय केले?"

विधान परिषदेचीही परिस्थिती वेगळी नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपला, आणि त्यानंतर नवी नेमणूक झालेली नाही. काँग्रेसने या पदावर दावा दाखल केला असून, सतेज पाटील हे नाव चर्चेत आहे. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन हा मुद्दा उपस्थित केला, पण अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

दरम्यान, विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करता काँग्रेसकडे सात सदस्य, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे तीन सदस्य आहेत. काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसकडे आवश्यक ताकद असल्याचं पक्षाचं मत आहे. दिल्लीत पक्ष नेतृत्वाने सतेज पाटील यांच्या नावाला मंजुरी दिल्याची माहितीही समोर आली आहे. एकंदरीत आता सर्वांना प्रश्न पडलाय की, हिवाळी अधिवेशनात सत्तेला प्रश्न विचारणारा नेता कोण असेल? विरोधकांचा आवाज कोण उचलेल? त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष आहे ते म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारच्या विरुद्ध पहिला प्रश्न कोणता नेता विचारणार? यावर.

हेही वाचा: Mumbai Local Train: आज मुंबईत लोकल ट्रेन मार्गांवर मेगाब्लॉक; मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर वाहतूक विस्कळीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number