Maharashtra Weather Update: शेतकरी दादा, सावधान! काढणीला आलेल्या पिकांवर पावसाचं सावट; हवामान विभागाचा नवा इशारा

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज असून, कोकणात दमट उष्णता वाढू शकते. हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काढणी करताना खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: शेतकरी दादा, सावधान! काढणीला आलेल्या पिकांवर पावसाचं सावट; हवामान विभागाचा नवा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचा एक आगळावेगळा 'बदल' पाहायला मिळत आहे. कधी दुपारी घामाच्या धारा काढणारे कडाक्याचे ऊन, तर कधी पहाटे अंगात काटा आणणारा गुलाबी गारवा; अशा दुहेरी हवामानामुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, हा प्रकार इथेच थांबणार नसून उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार आहेत.

'वेस्टर्न डिस्टरबेंस'चा महाराष्ट्राला फटका?

राज्यातील हवामानात सर्वात मोठा बदल 17 आणि 18 फेब्रुवारीच्या दरम्यान अपेक्षित आहे. एक नवा 'वेस्टर्न डिस्टरबेंस' (पश्चिमी विक्षोभ) सक्रिय होत असून, त्याचे परिणाम केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित न राहता मध्य भारतापर्यंत पोहोचतील. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे जमिनीकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रातील काही भागात, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या सीमेवर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढणार

स्कायमेटने वेदरने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पॅसिफिक महासागराकडून येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील हवामानाची दिशा सातत्याने बदलत आहे. जरी या वादळांचा मुख्य जोर हिमालयाच्या डोंगराळ भागात असला, तरी त्याचे थेट पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. त्यामुळे पुढील 48 ते 72 तासांत राज्याचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्रीचा गारवा पुन्हा एकदा उपस्थिती दर्शवेल.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता NA परवानगीशिवायही मिळणार कामांना गती

कोकणात वाढणार उष्णता

राज्यातील इतर भागांत पावसाचे सावट असताना, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे असेल. याचा थेट परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आर्द्रता (Humidity) वाढणार आहे. परिणामी, मुंबईसह कोकण पट्ट्यात उन्हाचा चटका अधिक 'त्रासदायक' आणि दमट वाटण्याची शक्यता आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे तामिळनाडू आणि श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा

हवामानातील हा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या रब्बीची पिके काढणीला आली असतानाच, 17 आणि 18 फेब्रुवारी दरम्यान होणारे ढगाळ वातावरण पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढवू शकते. 'काढणीचे पीक हाती येताना' निसर्गाने दगा देऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच काढणीचे नियोजन केलेले फायद्याचे ठरेल. 

हवामानाचा हा विचित्र खेळ केवळ शेतीवरच नाही, तर मानवी आरोग्यावरही परिणाम करण्याची शक्यता आहे. कधी कडाक्याचे ऊन तर कधी बोचरी थंडी, अशा दुहेरी हवामानामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. 17 फेब्रुवारीनंतर होणारा हा बदल तात्पुरता असला, तरी तो निसर्गाच्या लहरीपणाची जाणीव करून देणारा आहे. निसर्गाच्या या 'गुगली'समोर आता प्रशासन आणि बळीराजा किती सज्ज राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: RBI Banking Rules: बँकांच्या मनमानीला 'फुलस्टॉप''; RBI चा मोठा निर्णय, नको असलेले कॉल्स आणि सक्तीचा विमा आता इतिहास जमा; पाहा काय आहेत नवे नियम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number