Maharashtra Weather: मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यभर उष्णतेने नागरिकांची अक्षरशः दमछाक केली आहे. अनेक भागांत तापमानाचा पारा चढल्याने उकाडा असह्य झाला होता. मात्र आता या कडक उन्हातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असून काही जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशाराही जारी केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
सोमवारी 4 मे रोजी विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
5 मे रोजी संपूर्ण विदर्भ सतर्क
मंगळवारी 5 मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही भागांत वाऱ्याचा वेगही वाढू शकतो.
कोकण, मुंबई आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता
बुधवारी 6 मे रोजी कोकण पट्ट्यातही हवामान बदलण्याचे संकेत आहेत. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. याशिवाय मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. शहरी भागांत विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
7 मे रोजीही पावसाचा प्रभाव कायम
गुरुवारी 7 मे रोजी पश्चिम विदर्भातील काही जिल्हे, तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर येथे पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतही हवामान ढगाळ राहून सरी कोसळू शकतात. या सर्व भागांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अचानक पाऊस यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. झाडाखाली उभे राहणे टाळावे, विजांच्या वेळी मोकळ्या मैदानात जाणे टाळावे आणि हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. कडक उन्हाने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत असली तरी पुढील चार दिवस हवामान वेगाने बदलणार असल्याने सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.