Rajyasabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआत रस्सीखेच; ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी दिग्गजांची मोर्चेबांधणी, ‘ही’ नावं चर्चेत

ठाकरे गटात एका संभाव्य जागेसाठी अनेक दावेदार मैदानात उतरल्याने अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे.

Rajyasabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआत रस्सीखेच; ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी दिग्गजांची मोर्चेबांधणी, ‘ही’ नावं चर्चेत

मुंबई: राजकारणाच्या सारीपाटावर 'दिल्लीची गादी' आणि संसदेचे वरिष्ठ सभागृह नेहमीच प्रतिष्ठेचे राहिले आहे. 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, या निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. विशेषतः महाविकास आघाडीत (मविआ) उपलब्ध होणाऱ्या मर्यादित जागांवरून 'एका म्यानात दोन तलवारी' राहू शकत नाहीत, या म्हणीचा प्रत्यय सध्या येत आहे. मविआच्या वाट्याला जागा नक्की किती येणार, हे निश्चित होण्याआधीच 'मातोश्री'वर उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटल्याची खात्रीलायक माहिती आहे.

महाविकास आघाडीकडे असलेले सध्याचे संख्याबळ पाहता, त्यांच्या वाट्याला राज्यसभेची केवळ एकच जागा सुरक्षितपणे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने खुद्द शरद पवार यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पवारांचे नाव साहजिकच आघाडीवर आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत याच एका संभाव्य जागेसाठी प्रचंड रस्सीखेच आणि अंतर्गत चढाओढ पाहायला मिळत आहे.

सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत 'एक अनार, शंभर बिमार' अशी अवस्था निर्माण झाली आहे. विद्यमान राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी हवी आहे. तर दुसरीकडे, पक्षाचे निष्ठावान शिलेदार मानले जाणारे माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज्यसभेवर जाण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील बहुतांश नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दावेदारी थेट शब्दांत आणि आग्रहाने मांडली आहे.

हेही वाचा: Amrawati Crime : मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं! चिकन खाण्याचा वाद पोहोचला टोकाला, 12 वर्षाच्या लेकाच्या मृत्यूची खोटी तक्रार आणि…, नेमकं घडलं काय?

प्रत्येक इच्छुकाने उमेदवारीसाठी स्वतःचे राजकीय आणि प्रादेशिक गणितही श्रेष्ठींसमोर मांडले आहे. एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सध्या शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने, तिथे पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी राजन विचारे यांच्या नावाचा विचार व्हावा, असा मतप्रवाह आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये (मराठवाडा) भाजप आणि शिंदे गटाचे आव्हान मोडून काढण्यासाठी आक्रमक नेतृत्व म्हणून अंबादास दानवे आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी 'फिल्डिंग' लावली आहे. तर, कोकणावरील ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आणि दबदबा अधिक भक्कम करण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी राज्यसभेचे तिकिट पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

या संपूर्ण राजकीय नाट्याच्या मुळाशी आहे ती 2 एप्रिल 2026 ची मुदत. या दिवशी महाराष्ट्रातील तब्बल सात दिग्गज राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यात राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे आणि वजनदार नाव आहे. यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) डॉ. फौजिया खान हे सर्व नेते एकाच दिवशी संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होत आहेत.

एकीकडे शरद पवारांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व उमेदवारीच्या रिंगणात असण्याची शक्यता, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत एका जागेसाठी एक विद्यमान,तीन माजी खासदार आणि एक माजी विरोधी पक्षनेत्याची दाटी, यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार आणि जर ती ठाकरेंकडे आलीच, तर उद्धव ठाकरे कोणाच्या गळ्यात राज्यसभेची माळ टाकून कुणाचे मन राखणार? हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. या निमित्ताने मविआची एकजूट आणि पक्षप्रमुखांची राजकीय मुत्सद्देगिरी पुन्हा एकदा पणाला लागणार, हे मात्र नक्की!

हेही वाचा: RBI Monetary Penalty: संचालकांना कर्ज देणं महागात पडलं! आरबीआयने 'या' पाच बँकांना ठोठावला दंड; तुमचं खातं तर 'या' बँकेत नाही ना?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number