मुंबई: नेहमी त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक शैलीसाठी ओळखले जाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा राजकारणाची एक वेगळीच विधायक गुढी उभारली आहे. ‘भावी मुख्यमंत्री तुम्हीच’ अशा घोषणांच्या आणि सोशल मीडियावरील अनावश्यक वादांच्या भूलभुलैयातून बाहेर पडा, अशी साद घालत त्यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या नव्या डिजिटल मंचाची घोषणा केली आहे. काल गुढीपाडव्याच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. हा केवळ एक राजकीय विषय नसून, सामान्य माणसाच्या डोक्यातील प्रगल्भ आणि नावीन्यपूर्ण आयडिया थेट सरकार दरबारी पोहोचवणारा एक महामार्ग ठरणार आहे.
राजकारणात जुने संदर्भ नेहमीच महत्त्वाचे असतात. 2014 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची बहुचर्चित ‘ब्लूप्रिंट’ मांडली होती. मात्र, आज 2026 साली या घटनेला तब्बल 12 वर्षे पूर्ण होत असताना, राज यांनी एक मोठी खंत व्यक्त केली. “गेल्या 12 वर्षांत महाराष्ट्र बदलला, लोकांचे विचार बदलले, पण एकाही पत्रकाराने मला त्या ब्लूप्रिंटमध्ये नेमकं काय आहे, हे विचारण्याची तसदी घेतली नाही. ती वाचण्यापेक्षा हिणवण्यातच अनेकांना रस होता,” असा टोला त्यांनी लगावला. आता मात्र काळाची पावले ओळखून त्यांनी या जुन्या संकल्पांना एका नव्या, आधुनिक डिजिटल मंचाचे स्वरूप दिले आहे.
वर्तमानपत्रांमधील लेख, सोशल मीडियावरील चर्चा आणि तज्ज्ञांची मते यांमधून अनेकदा राज्याच्या विकासासाठी उत्तम संकल्पना पुढे येतात. पण खरा प्रश्न पडतो की, हे सांगायचे कुणाला? सरकार नावाच्या अवाढव्य यंत्रणेपर्यंत सामान्य माणसाचा आवाज पोहोचणार कसा? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नेमकी हीच प्रशासकीय पोकळी भरून काढण्यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील किंवा परदेशात स्थायिक झालेल्या मराठी माणसाकडे जर महाराष्ट्राच्या भल्याची एखादी योजना असेल, तर त्याला आता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
ही वेबसाईट केवळ नावाला नसून तिची तांत्रिक रचना अतिशय अभ्यासपूर्ण करण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पोर्टलवर वापरकर्त्यांच्या सोयीसाठी एक ‘ऑडिओ गाईड’ देखील देण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा तब्बल 27 विविध विषयांवर नागरिक आपल्या संकल्पना मांडू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही दिलेली आयडिया थेट वाऱ्यावर जाणार नाही. ती आधी एका तज्ज्ञांच्या समितीकडून घासून-पुसून तपासली जाईल. तिथे ती योग्य ठरल्यास, मनसे एक ‘संवादक’ म्हणून ती थेट सरकारपर्यंत पोहोचवेल आणि ती अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा करेल असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
बदलत्या काळात तरुणाई मोबाईल आणि सोशल मीडियाच्या ‘गटारगंगेत’ अडकत चालल्याची सार्थ भीती राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. या आभासी जगातून बाहेर पडून महाराष्ट्राच्या नवनिर्माणात सक्रिय वाटा उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याला आता पोकळ कौतुकाची नाही, तर एका नव्या, प्रगल्भ विचारांची गरज आहे. ‘महाराष्ट्र नेक्स्ट’च्या माध्यमातून राज ठाकरेंनी टाकलेले हे पाऊल महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ टीकेकडून विधायकतेकडे नेणारे एक आशादायी पर्व ठरू शकते.