संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निर्णय न झाल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निवडणुकांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
आज होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाचा कौल मतदारराजा कोणाच्या नावाने देणार आहे हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. राज्यातील काही ठिकाणी महायुतीतील तीन पक्ष, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे त्यांच्या काही आपापसातल्या गाजलेल्या कारणांमुळे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे पाहायला मिळाले आहेत. दरम्यान आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण विभागनिहाय संख्या किती आणि त्यानुसार कोणत्या ठिकाणी हाय व्होल्टेज लढती रंगणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच लक्ष्य लागल आहे.
यावेळी महाराष्ट्रात तीन ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल बिनविरोध लागले आहेत. या तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष निश्चित झाल्या असून तिन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या आहेत. त्यात साधना महाजन (भाजपा) जामनेर, नयनकुंवर रावल (भाजपा) दोंडाई आणि प्राजक्ता पाटील (भाजपा) अनगर या आहेत.
विभागनिहाय संख्या –
कोकण विभाग- 27
नाशिक विभाग – 49
पुणे विभाग – 60
छत्रपती संभाजीनगर – 52
अमरावती विभाग – 45
नागपूर विभाग – 55
कणकवली नगरपालिका
कणकवलीत भाजप नेत्याच्या घरी पैशांची बंडलं सापडल्याचा आरोप करत निलेश राणेंनी व्हिडीओ शेअर केला. त्याचसोबत मुस्लिम मतदार, खोटे जात प्रमाणपत्राच्या आरोपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत मोठा आरोप केला आहे. एवढच नव्हे तर भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे निलेश राणे या दोन भावांमध्ये देखील राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे तळकोकणातील कणकवलीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
सांगोला
सोलापूरमध्ये भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला असून विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप देखील केला. त्यामुळे सांगोल्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद पेटल्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमधील चंदगड, कागल
कोल्हापूर चंदगड नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचपार्श्वभूमिवर कागलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजीत घाटगे या दोन कट्टर विरोधकांची शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांविरोधात एकी पाहायला मिळणार आहे .
हिंगोली
हिंगोलीत शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत मतदान करत असताना गोपनीयतेचा भंग केला आहे. याशिवाय मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेत घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला. याचपार्श्वभूमिवर भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिंदेंचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात जुंपली पाहायला मिळणार आहे.
रायगड
रायगडमध्ये पाहायच झालं तर, रोहा, कर्जत, पनवेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आमने-सामने असून यांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. दरम्यान निवडणुकीपुर्वीच दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद देखील पाहायला मिळाले त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. यावेळी रायगडमध्ये रोहा येथे वनश्री शेडगे (राष्ट्रेवादी कॉंग्रेस, अजित पवार गट), शिल्पा येथे धोत्रे, (शिवसेना शिंदे गट), महाड येथे सुनील कविस्कवर (शिवसेना शिंदे गट), सुदेश कळमकर, (राष्ट्रदवादी कॉंग्रेस अजित पवार गट) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अंबरनाथ
अंबरनाथमध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद असून, मातोश्रीनगर परिसरात पैसे वाटपाच्या आरोपावरून शिंदेंच्या उमेदवाराने बोगस मतदान आणल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला आहे.
पालघर
पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू जव्हार या तीन नगरपरिषदा तर वाडा या नगरपंचायतसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. चार ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून 94 नगरसेवकांच्या जागा तर चार नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. डहाणू नगर परिषदेतील निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची असून भाजप विरोधात सर्वपक्षीय डहाणूत एकवटल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर प्रचारादरम्यान जहरी टीका देखील केली होती.