Ratnagiri Election Result 2025: कोकणात महिलाराज..! रत्नागिरीत 4 पैकी 3 नगरपरिषद तर तिन्ही नगरपंचायतीवर महिला नगराध्यक्ष

राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून कोकणात महिलांचे वर्चस्व दिसून आले आहे.

Ratnagiri Election Result 2025: कोकणात महिलाराज..! रत्नागिरीत 4 पैकी 3 नगरपरिषद तर तिन्ही नगरपंचायतीवर महिला नगराध्यक्ष

Ratnagiri Election Result 2025: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 23 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली. विविध ठिकाणी निकालांचे कल समोर येऊ लागले असून, काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा वेगळे आणि धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत.

या निवडणुका एकूण 143 सदस्यपदांच्या जागांसाठी घेण्यात आल्या होत्या. यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका आधी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निर्णय न झाल्याने काही ठिकाणी मतदान होऊ शकले नव्हते. अखेर 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.

हेही वाचा: Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मतदारराजाचा कल नेमका कुणाकडे झुकतो, हे या निकालांतून स्पष्ट होत आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात या निकालांनी वेगळे चित्र समोर आणले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदांवर शिवसेनेने विजय मिळवला असून, दोन नगरपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसलाही एका नगरपरिषदेत यश मिळाले आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे विजयी झाल्या आहेत. चिपळूण नगरपरिषदेत उमेश सकपाळ यांनी शिवसेनेतर्फे विजय मिळवला, तर खेड नगरपरिषदेत माधवी बुटाला यांनी नगराध्यक्षपदावर बाजी मारली. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले असून, त्या माजी आमदारही आहेत.

हेही वाचा: Pune Nagar Parishad Election Results: बालेकिल्ला शाबूत ! पुण्यात 'दादां'चीच हवा; 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीची गुढी

नगरपंचायत निकालांकडे पाहिले असता, लांजा नगरपंचायतीत सावली कुरुप (शिवसेना), देवरुख नगरपंचायतीत मृणाल शेट्ये (भाजप) आणि गुहागर नगरपंचायतीत निता मालप (भाजप) यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.

या निकालांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कोकणात दिसून आलेले महिलांचे नेतृत्व. चारपैकी तीन नगरपरिषदांवर आणि तिन्ही नगरपंचायतींवर महिला नगराध्यक्ष निवडून आल्या आहेत. त्यामुळे “कोकणात महिलाराज” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकूणच, या निकालांमधून स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण, पक्षांची ताकद आणि मतदारांचा मूड स्पष्ट होत असून, येत्या काळातील राजकीय हालचालींवर या निकालांचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number