मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकींचा निकाल 16 जानेवारीला लागणार आहे, पण हा निकाल नेमका कधी स्पष्ट होणार? याबाबत आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. नेहमीप्रमाणे दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होईल, असा विचार जर तुम्ही करत असाल, तर थांबा! कारण यावेळी मतमोजणीची प्रक्रिया इतकी वेळखाऊ असण्याची शक्यता आहे की, गुलालाची उधळण करण्यासाठी कार्यकर्त्यांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळावे लागू शकते. निवडणूक आयोगाच्या एका संभाव्य निर्णयामुळे उमेदवारांची धाकधूक आता शिगेला पोहोचली आहे.
या वेळच्या मतमोजणीत सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो तो म्हणजे 'वॉर्डनिहाय मतमोजणी'चा नवा फॉर्म्युला. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न होता, एका वेळी एकाच वॉर्डची मोजणी होण्याची शक्यता आहे. प्रक्रियेनुसार, सर्वात आधी टपाली मतदानाची (Postal Ballots) मोजणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएम (EVM) उघडले जातील. पण जर एका केंद्रावर एकावेळी एकाच प्रभागाची मोजणी झाली, तर संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी चक्क दुसऱ्या दिवसाची सकाळही उजाडू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचे उदाहरण घेतले तर येथील गणित अधिकच गुंतागुंतीचे आहे. मुंबईत 227 प्रभाग असून 23 विभागांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विभागात आठ ते दहा प्रभाग येतात. जर एका वेळी एकच प्रभाग या पद्धतीने मोजणी झाली, तर एका प्रभागासाठी किमान दीड तास लागणार आहे. याचा अर्थ जिथे जास्त प्रभाग आहेत, तिथले निकाल मध्यरात्रीनंतरच स्पष्ट होतील. यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून, "निकालासाठी इतका वेळ आमचा संयम टिकणार का?" असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
या विलंबामुळे केवळ राजकीय पक्षांचीच नाही, तर पोलीस यंत्रणेचीही डोकेदुखी वाढणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी, विजयाचा जल्लोष आणि पराभवातून निर्माण होणारी हुल्लडबाजी यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरेल. रात्र जसजशी वाढत जाईल, तसा तणाव आणि कामाचा ताण यंत्रणेवर येणार आहे. मतमोजणीत होणारे आक्षेप आणि वाद यामुळे ही प्रक्रिया अधिकच जिकिरीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिका प्रशासनाने अद्याप या प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना न मिळाल्याने निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण मागवले आहे. कमी प्रभाग असलेल्या पालिकांचे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल, पण मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांच्या निकालाचा सस्पेन्स मध्यरात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 16 जानेवारीला राजकारणात 'काँटे की टक्कर' तर दिसेलच, पण निकालाची प्रतीक्षा कार्यकर्त्यांच्या धैर्याची खरी परीक्षा घेणारी ठरेल.