मुंबई: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा तोफास आज सायंकाळी थंड होणार आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर आज अखेर प्रचाराचा शेवटचा दिवस असून, राज्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. राज्यात एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून, 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, सभा, रॅली, रोड शो आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी उमेदवार घरोघरी भेटी देत प्रचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंची ठाण्यातील सभा तसेच शिवाजी पार्कवर झालेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा चांगलीच गाजली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, आज सकाळपासूनच प्रचाराचा धडाका सुरू असल्याचे चित्र आहे.
या संदर्भात ‘जय महाराष्ट्र’ न्यूजच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी सविस्तर माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबवणे बंधनकारक असून, आज सायंकाळी साडेपाच नंतर प्रचाराच्या तोफा थंडावतील.
निवडणूक काळात तीन दिवसांचा ड्राय डे पाळला जात असून, आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. कार्यकर्त्यांनी नियम मोडल्यास त्याचा थेट फटका पक्षालाही बसू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. आचारसंहितेचे नियम सर्वच पक्षांसाठी समान असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
एकूणच, मतदानाच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रचार संपल्यानंतर आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.