मुंबई: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. १५ मेनंतर टाळेबंदीचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ‘कोरोनाची राज्यातील लाट थोपविण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही दोन तृतीयांश भागात बाधितांची संख्या वाढत आहे. केवळ १३ जिल्ह्यांत कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर ज्या जिल्ह्यात रुग्णवाढ होईल तेथे संपूर्ण टाळेबंदी करावीच लागेल’. तसेच राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करायची की सध्याचे निर्बंध कमी करायचे याबाबतचा निर्णय १५ तारखेपूर्वी घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला काही प्रमाणात लगाम लावण्यात सरकारला यश आले आहे. तरीही राज्यात दररोज ५५ हजारच्या पुढे नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात टाळेबंदी सुरू करण्यात आली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनीही संपूर्ण राज्यात टाळेबंदीचे संकेत दिले आहेत.
मुंबई, ठाण्यासह १३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीला लगाम लागला असून नव्या बाधितांचे प्रमाणही कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी उर्वरित २२ जिल्ह्यांतील कोरोना स्थिती चिंताजनक आहे.