Maharashtra Election Update: निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कारण काय?

न्यायालयीन अपीलमुळे काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया बाधित झाल्याने निवडणूक आयोगाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maharashtra Election Update: निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कारण काय?

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सुपर संडे ठरणार असतानाच निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन अपीलांमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना लक्षात घेऊन आयोगाने त्या ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेत तातडीने बदल करण्याचे ठरवले. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये मतदानाची नवी तारीख 20 डिसेंबर निश्चित करण्यात आली असून मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.

राज्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या काही आदेशांविरोधात उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलांचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवर लक्षणीय झाला. छाननीनंतर आलेल्या अपीलांच्या निकालांमुळे काही ठिकाणी उमेदवारांना तीन दिवसांचा नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी न देता थेट चिन्हवाटप करण्यात आले. हा निर्णय नियमांच्या विरोधात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील तरतुदींनुसार उमेदवारांना हा कालावधी देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: BMC Elections 2025: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज; 11 सदस्यीय जाहीरनामा समिती जाहीर

अपील निकाल 22 नोव्हेंबर नंतर येऊ लागल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रियेची वैधता धोक्यात आली. विशेषत: ज्या वॉर्डांशी संबंधित सदस्यपद किंवा अध्यक्षपदाच्या निवडणुका प्रलंबित होत्या, अशा ठिकाणी संपूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यामुळे काही ठिकाणी आधी जाहीर केलेले वेळापत्रक तात्काळ मागे घेण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांना नव्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

29 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशपत्रानुसार, सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसाठी मूळ कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन हस्तक्षेप वाढल्यामुळे आयोगाला सुधारित वेळापत्रक जाहीर करणे अपरिहार्य ठरले. सुधारित कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी 4 डिसेंबर रोजी नवे निवडणूक वेळापत्रक प्रसिद्ध करतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी चिन्हवाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. पुढील मतदान 20 डिसेंबर ला होणार असून निकाल 21 डिसेंबर ला जाहीर करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संबंधित ठिकाणांवरील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून पक्षांनी नव्या वेळापत्रकानुसार प्रचारयोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: PM Modi: 'मन की बात' चा 128 वा भाग आज; पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number