नागपूर: महाराष्ट्र राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या अटीतटीच्या मतदानाचा अंतिम निकाल आज, 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकांकडे आगामी महापालिका निवडणुकांची 'सेमीफायनल' म्हणून पाहिले जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष निकालांकडे लागले आहे. आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती येतील अशी चिन्हे आहेत. लहान शहरांमधील मतदारांचा कौल कोणाकडे आहे आणि कोणत्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात यावेळची लढत अत्यंत चुरशीची ठरली आहे. जिल्ह्यातील 12 नगरपंचायती आणि 15 नगरपरिषदांच्या निकालावर राजकीय धुरंधरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी हा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान आहे, तर काँग्रेसचे सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली, तरी दिग्गज नेत्यांच्या भविष्यातील गणितांसाठी या निकालांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
विदर्भातील मुख्य लढतींकडे पाहिले तर कामठीमध्ये भाजपचे अजय अग्रवाल, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम आणि काँग्रेसचे शकूर नागानी यांच्यात तिरंगी मुकाबला आहे. सावनेरमध्ये संजना मंगळे (भाजप) आणि सीमा चाफेकर (काँग्रेस) यांच्यात थेट लढत होत आहे, काटोलमध्ये राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पाठिंब्यावर शेकापच्या अर्चना देशमुख आणि भाजपच्या कल्पना उमप यांच्यात चांगलीच लढत झाली आहे. रामटेक नगरपरिषदेत भाजपच्या ज्योती कोल्हेपरा, शिवसेनेच्या (शिंदे गट) बिकेंद्र महाजन आणि काँग्रेसच्या रमेश कारेमोरे यांच्यात चुरस पाहायला मिळते आहे.
पश्चिम विदर्भ आणि इतर जिल्ह्यांमध्येही राजकीय चित्र रंजक आहे. पुसदमध्ये मोहिनी नाईक (अजित पवार गट), निखिल चिद्दरवार (भाजप), महंमद नदीम (काँग्रेस) आणि अनिल ठाकूर (उबाठा) यांच्यात चौरंगी संघर्ष आहे. यवतमाळमध्ये भाजपच्या प्रियदर्शनी उईके आणि काँग्रेसच्या प्रियंका मोघे यांच्यासह शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनीही आव्हान निर्माण केले आहे. भंडारा, गोंदिया आणि बुलडाणा या जिल्ह्यांतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा संमिश्र आणि अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या आहेत.
राज्यातील लहान शहरांचा आणि निमशहरी भागांचा मूड आज स्पष्ट होणार आहे. स्थानिक प्रश्न, विकासाची कामे आणि नेत्यांची जनसंपर्क यंत्रणा कोणाच्या पथ्यावर पडते, हे काही तासांतच समोर येईल. दुपारनंतर राज्यभरात विजयाचे फटाके फुटणार की सत्ताधाऱ्यांना धक्क देणारे निकाल लागणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष आहे.