सध्या संपूर्ण देशभरात पंतप्रधान मोदी यांच्या नव्या आवाहनांची चर्चा सुरू आहे. यावरूनच आता महाराष्ट्र राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्य प्रशासनाने आता आर्थिक खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र या निर्णयांची चर्चा सुरू आहे. आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना सूचना केल्या आहेत.
मंत्र्यांनी तत्काळ आपला वाहनताफा अर्ध्यावर आणावा
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, मंत्र्यांनी तात्काळ आपला ताफा अर्ध्यावर आणावा. कोणत्याही स्थितीत पदाधिकारी, आमदार असा लवाजमा (वाहन अनुषंगाने) मागे फिरणार नाही, हे सुनिश्चित करावे. विदेश दौरे, खाजगी असतील तरी करू नयेत. याशिवाय विशेष विमान, हेलिकॉप्टर प्रवास टाळावा. ठरवून आठवड्यातील एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा. आपल्या कार्यालयात स्टाफ आहे. त्यांना वाहने दिली आहेत, त्याचा आढावा घ्या आणि वाहनसंख्या कमी करा.
डिजीटल बैठकांना प्राधान्य द्या
शक्य तितक्या बैठका 'डिजिटल' म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे. तसेच, अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही परदेश दौऱ्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅंटिनमधील मेन्यू होणार कमी
सरकारी कार्यालयातील कँटीन, रुग्णालये आणि अंगणवाडी येथील खाद्यपदार्थांच्या मेन्यू कार्डमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. आरोग्याला महत्त्व देतानाच खाद्यतेलाचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
मिरवणूक,बाईक रॅली टाळा
प्रशासकीय खर्चासोबतच इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे आता वाहनांच्या मिरवणुका आणि बाईक रॅलींना परवानगी नाकारली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात इंधन खर्च होते आणि वाहतूक कोंडी देखील निर्माण होते त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.