Maharashtra Airports: हवाई दळणवळणाला गती! यवतमाळसह ‘या’ चार विमानतळांबाबत सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने बारामती, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ येथील विमानतळांचे व्यवस्थापन एमएडीसीकडे दिले आहे. या निर्णयामुळे विदर्भ व मराठवाड्यातील हवाई दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.

Maharashtra Airports: हवाई दळणवळणाला गती! यवतमाळसह ‘या’ चार विमानतळांबाबत सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Airports: महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बारामती, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि यवतमाळ येथील विमानतळांचे व्यवस्थापन व विकासाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी झाला असून, या निर्णयामुळे राज्यातील हवाई पायाभूत सुविधा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत हे चारही विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारित होते. याआधी झालेल्या सामंजस्य करारांनुसार धाराशिव, लातूर आणि यवतमाळ विमानतळांचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर आता एमएडीसीकडे संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की, विमानतळांचा मालकी हक्क राज्य शासनाकडेच राहणार असून, केवळ विकास व व्यवस्थापनाची धुरा एमएडीसीकडे दिली जाणार आहे.

हेही वाचा: Oppo A6 Pro: पाण्यात पडला तरी बिघडणार नाही; बॅटरी चार्जिंग सुद्धा काही मिनिटात, Oppo चा हा नवीन फोन विक्रीसाठी उपलब्ध

या निर्णयानुसार, संबंधित विमानतळांवर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. धावपट्ट्यांची दुरुस्ती, विस्तार आणि मजबुतीकरण, प्रवासी टर्मिनल इमारती, सुरक्षाव्यवस्था, तसेच आधुनिक हवाई सेवा सुविधांचा समावेश या विकासकामांमध्ये असणार आहे. भविष्यात शासनाकडून लागू होणाऱ्या धोरणात्मक अटी व नियम एमएडीसीला बंधनकारक असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यवतमाळ विमानतळाच्या दृष्टीने हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेले हे विमानतळ सध्या प्रामुख्याने प्रशिक्षण, चार्टर विमाने, शासकीय हेलिकॉप्टर आणि आपत्कालीन सेवांसाठी वापरले जाते. सध्या येथे व्यावसायिक प्रवासी उड्डाणे सुरू नाहीत. विद्यमान धावपट्टी लहान विमानांसाठी योग्य असली तरी मोठ्या प्रवासी विमानांसाठी अद्ययावत सुविधा आवश्यक आहेत.

हेही वाचा: Viral Video : चांगलीच जिरली! घरातील एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकला चोर; व्हिडिओ तुफान व्हायरल

एमएडीसीकडे जबाबदारी गेल्यानंतर यवतमाळ विमानतळावर धावपट्टीचा विस्तार, नाइट लँडिंगची सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा, तसेच नवीन टर्मिनल इमारती उभारण्याची शक्यता आहे. भविष्यात एटीआर-72 सारखी विमाने येथे उतरू शकतील, अशी सुविधा विकसित करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विमानतळ पूर्णतः विकसित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत यवतमाळला देशाच्या हवाई नकाशावर स्थान मिळण्याची शक्यता आहे. नागपूर, मुंबई, पुणे आणि हैदराबादसारख्या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्यास विदर्भातील दळणवळण सुलभ होईल.

एकूणच, या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि प्रवास सुलभतेच्या दृष्टीने हा निर्णय राज्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number