सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदीला पुर आल्याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरले असून बाधित कुटुंबांचे पंचनामे सुरू आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या पूरग्रस्तांच्या खात्यात बुधवारी 1 ऑक्टोबरपासून प्रत्येकी दहा हजार रुपये मदत रक्कम जमा होईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरस्थितीबाबत माहिती दिली. शासनाने पूरग्रस्तांसाठी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देण्याचे आदेश दिले असून, या धान्याचे वाटप सुरू आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना रोख मदतही दिली जाणार आहे.
सहा तालुक्यांतील 88 गावे बाधित
पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 88 गावे बाधित झाली आहेत. यात माढा 22, करमाळा 11, मोहोळ 21, अक्कलकोट 10, उत्तर सोलापूर 9 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 15 गावे आहेत. आतापर्यंत 4 हजार 521 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पुरामुळे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर तोडगा म्हणून शेजारच्या जिल्ह्यांतून चारा आणला जात आहे. शनिवार आणि रविवारी मिळून 20 टन चारा वाटप करण्यात आला असून, सोमवारी हा आकडा 100 टनांपेक्षा जास्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पूरग्रस्तांसाठी मदत
जिल्ह्यातील साखर कारखाने, बँका आणि विविध संस्था पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे सरसावल्या आहेत. बाहेरून मदत आली तर आम्ही स्वागत करू, मात्र जिल्हा प्रशासन सध्या स्वतंत्रपणे परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. आलेली प्रत्येक मदत आम्ही नियोजनपूर्वक लोकांपर्यंत पोहोचविणार आहोत ,असे जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले.
निवारा केंद्रांची व्यवस्था
पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यात 120 निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यात एकूण 12 हजार 956 लोकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार,
अक्कलकोट : 35 केंद्रे
उत्तर सोलापूर : 2,859 लोक
करमाळा : 560 लोक
दक्षिण सोलापूर : 243 लोक
माढा : 5,426 लोक
मोहोळ : 3,800 लोक