Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात हिवाळ्याने अखेर जोरदार हजेरी लावली असून राज्यातील बहुतांश भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे हवेतला गारवा आणखीनच वाढला आहे. हवामान विभागाने राज्यातील 14 जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करत नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: तापमानात जाणवण्यासारखी घट झाली आहे. जळगाव, नाशिक, धुळे, निफाड, परभणी यांसारख्या ठिकाणी किमान तापमान 7 ते 9 अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. काही भागात तर सकाळच्या वेळेस दवबिंदू गोठण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून शेतजमिनीवर दवाचा पांढरा थर दिसून आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात निर्माण झालेल्या हिमवादळामुळे आणि वाऱ्याच्या दिशेत बदल झाल्याने या भागात तापमान आणखीन कमी होत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी सतत वाढत आहे. पहाटे अनेक भागांत तापमान ७ अंशांपर्यंत खाली आले असून रस्त्यांवर दाट धुके पसरलेले दिसत आहे. सकाळच्या वेळेस वाहनचालकांना धुक्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडणे कठीण झाले आहे.
विदर्भातही थंडीचा जोर कमालीचा वाढला आहे. यवतमाळ, नागपूर आणि अमरावतीमध्ये तापमानात सतत घसरण होत आहे. यवतमाळमध्ये तर सलग दुसऱ्या दिवशी तापमान 10 अंशांच्या आत नोंदले गेले. संध्याकाळी चारनंतरच थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रात्रीचे तापमान झपाट्याने कमी होत असल्याने गारठा वाढत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
पुणे, सातारा, अहमदनगर, गोंदिया, मालेगाव यांसारख्या शहरांमध्येही तापमान 9 ते 10 अंशांच्या घरात आहे. महाबळेश्वरमध्येही हिवाळ्याची तीव्रता वाढली असून पर्यटकांनी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच थंडीचा जोर जाणवत असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
हवामान खात्याचा अंदाज आहे की, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडीची ही तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागांत तापमान आणखी घसरू शकते. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, तापमानातील घसरणीचा परिणाम शेतीवरही दिसत असून काही भागात कांदा, भाजीपाला आणि फळबागांवर दवाचा परिणाम जाणवत आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यातील गारठा पुढील काही दिवस टिकण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र ‘हिवाळ्याच्या शिखरावर’ पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.