नवी दिल्ली : अखेर शिवसेना उबाठा गटाच्या त्या सहा खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. दरम्यान, ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. आज, बुधवारी या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याचे समजते.