Loha Election Result 2025:नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. घराणेशाहीवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपलाच मतदारांनी याच मुद्द्यावरून जोरदार धक्का दिला आहे. एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपसाठी महागात पडल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मतदारांनी थेट संदेश देत या सहाही उमेदवारांना पराभूत केल्याने भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचबरोबर नगरसेवकपदासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना तिकीट देण्यात आले. पत्नी, भाऊ, भावजय, मेहुणा आणि भाच्याची पत्नी अशा सहा जणांना मैदानात उतरवल्याने ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. मात्र मतदारांनी या घराणेशाहीला स्पष्ट नकार देत भाजपला मोठा धक्का दिला.
विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी भाजपने प्रचारात कोणतीही कसर ठेवली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांनी लोह्यात सभा घेतल्या. राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनीही कॉर्नर बैठका घेत भाजपसाठी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. तरीही मतदारांच्या निर्णयावर या प्रचाराचा फारसा परिणाम झाला नाही.
या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोह्यात आपली ताकद ठामपणे दाखवून दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह तब्बल 17 जागांवर विजय मिळवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. एकूण 10 प्रभागांतील 20 नगरसेवकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या हातात घेतली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निकाल केवळ स्थानिक पातळीवरचा नसून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र रंगवले जात होते. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि आता लोहा नगरपरिषदेत झालेली दारुण हार यामुळे भाजपच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का
भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक इच्छुक उमेदवार कमळावर लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र एकाच कुटुंबाला सहा तिकीट देण्याचा निर्णय स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांना न पटल्याची चर्चा आहे. परिणामी मतदारांनी थेट निकालातून आपला रोष व्यक्त केला.
एकूणच, लोहा नगरपरिषद निवडणूक ही घराणेशाहीविरोधात दिलेला ठोस कौल म्हणून पाहिली जात आहे. या निकालामुळे भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये हा धडा कितपत लक्षात घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.