भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा, मसनात जा, पण आरक्षण द्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहित सुप्रिया सुळेंवर टीका करणाऱ्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र राज्य महिला आयोगाला लिहिले आहे. या पत्रामध्ये चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, सावली,आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दुःख नाही.
माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.