हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा में विविध राजकीय वादविवाद आणि घडामोडी घडल्या. या दिवशी अनेक मुद्दयांवर तीव्र चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाले. जाणून घेऊया नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाल्या त्याबद्दल.
लाडक्या बहिणींचा उल्लेख
भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्यातील अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर बोलताना लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. यावेळी फडणवीस म्हणाले की, "मी सभागृहातील सदस्यांना पुन्हा एकदा सांगतो.प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण योजना आणू नका. लाडकी बहिण योजनेच्या विरोधात जाऊ नका.अन्यथा घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणण्याला काय अर्थ आहे? लाडक्या बहिणींचे पैसे चालू राहणार आहेत. ही योजना चालू राहील. या योजनेची दुसऱ्या योजनेशी तुलना करता येत नाही"
भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरुन भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद उफाळून आले. महायुतीत एकनाथ शिंदे नाराज आहेत का? याबद्दल अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे मी देखील सांगितलं आणि त्यांनीही सांगितलं. मी आणि एकनाथ शिंदे एका हेलिकॉप्टरने आलो, गप्पा मारल्या. एका गाडीत बसून गप्पा मारल्या. त्यानंतर मंचावर बसलो. ते त्यांच्या विचारात, मी माझ्या विचारात. त्यांनी भाषण केलं, मी भाषण केलं. लगेच त्यातली दृश्यं दाखवली गेली, बघा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांशी बोललेच नाहीत. मी ती बातमी पाहिल्यावर एकनाथ शिंदेंना म्हटलं, आपलं काम असो किंवा नको आपण बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे इतका वेडेपणा आहे. अशा बातम्या केल्या जातात त्याला आम्ही काय करणार?", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही
दरम्याने अंबादास दानवे यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर तीन व्हिडीओ शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये सत्ताधारी पक्षांचे आमदार नोटांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच दानवेंनी केला. अंबादास दानवे म्हणाले की, "या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत? आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?" असा सवाल अंबादास दानवेंनी केला.