वकिलाने लिहिलं पत्र; चोरट्याने चोरी करणं केलं बंद

घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना कंटाळून वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं.

वकिलाने लिहिलं पत्र; चोरट्याने चोरी करणं केलं बंद

गणेश जाधव, प्रतिनिधी, जालना: जालना शहरातील एका वकिलाच्या घरात चोरट्यांनी तब्बल तीन वेळा चोरी केली. याबाबत संबंधित वकिलाने पोलीसांकडे तक्रार देखील केली. मात्र तरीही चोरटे काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे, घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना कंटाळून वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं. चला तर सविस्तर जाणून घेऊया नेमकं काय आहे हा प्रकार. 

जालनातील एसटी कॉलनीमध्ये ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांचं वडिलोपार्जित घर आहे. 5 महिन्यांपूर्वी काही अज्ञात चोरट्यांनी याच घरामध्ये हात साफ करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत ॲडव्होकेट हट्टेकर यांनी पोलिसांत तक्रार देखील केली. मात्र, चोरटे काही केल्या पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. पण, या चोरीच्या घटनेमुळे ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांचं कुटुंब सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भयभीत झालं. चोरट्यांच्या उपद्रवामुळे ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांच्या घराचे दरवाजे आणि कडी-कोयंडा यांचाही मोठा नुकसान झाला. या चोरीच्या घटनांमुळे ॲडव्होकेट ललित हट्टेकर हतबल झाले आणि त्यांनी अनोखी शक्कल लढवली; घराच्या भिंतीवर चोरट्यांसाठी एक पत्र लिहून ठेवलं.

पत्रामध्ये ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांनी लिहिलं:

'माननीय चोरसाहेब, सस्नेह नमस्कार. जोखीम त्याचप्रमाणे तंत्रज्ञान, समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण करीत असलेल्या कलेला वंदन. आपली ओळख नाही. परंतु तीन चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाटेस निराशा आली असेल. एक वेळेस मात्र, आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेलात. आपण, पत्नी आणि मुलासह घरात राहतो. घरात सोने-चांदी तसेच पैसे नाहीत. भांडीकुंडी, वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे. त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. कडी-कोयंडे तोडल्यामुळे माझे नुकसान होते. चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल. मोठी रक्कम दिल्यावर हे घर मी तुम्हाला विकू शकतो. मग तुम्ही तेथे अवैध धंदे करू शकाल', असेही अज्ञात चोरांना उद्देशून ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं.  
त्यासोबतच ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांनी स्वतःकडे शस्त्र परवाना असल्याची जाणीवही चोरट्यांना करून दिली आहे.

ॲडव्होकेट हट्टेकर यांच्या पत्राने चोरटे घराकडे फिरकलेही नाहीत:

ॲडव्होकेट हट्टेकर यांना हे पत्र लिहून दीड महिने झाले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या दीड महिन्यात हे चोरटे त्यांच्या घराकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे हे पत्र लिहून फायदाच झाला, असा दावा हट्टेकर यांनी केला.

गेले अनेक महिने हे चोर पोलिसांच्या हाती लागत नव्हते, त्यामुळे पोलिसांना अपयश येत होतं. मात्र ॲडव्होकेट हट्टेकर यांनी अनोख्या पद्धतीने चोरट्यांना उत्तम प्रकारे धडा शिकवल्यामुळे शहरात सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number