लातूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी लातूरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. “विलासरावांच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत” या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. आता या निषेधाला आणखी धार देत काँग्रेस आणि विविध संघटनांनी लातूर बंदची हाक दिली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या अवघ्या चार शब्दांनीच काँग्रेस चांगलीच संतप्त झाली असून, या वक्तव्याला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतींचा अपमान असल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून या प्रकरणावरून सातत्याने आंदोलनाचा इशारा दिला जात होता, आणि अखेर लातूर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बंदला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारे नागरिक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, आजच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच काँग्रेसने बंदची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या घडामोडीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लातूर महानगरपालिकेसमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आज दुपारी साडेअकरा वाजता निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येणार असून, विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे.
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी काल या वक्तव्याबाबत काल माफी सुद्धा मागितली होती. मात्र, काँग्रेस आणि समर्थक संघटनांच्या मते ही माफी अपुरी असून, अशा प्रकारची विधाने पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. या संपूर्ण घटनेबाबत जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरमधील राजकीय वातावरण तापले असून, बंद आणि आंदोलनामुळे शहरातील जनजीवनावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.