मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात NCB ने सर्वात मोठी कारवाई केली असून NCB ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे. एनसीबीने सिद्धार्थला हैदराबादमधून अटक केली. सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली केली होती. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं. अनेकांचा तर या घटनेवर विश्वासच बसला नव्हता. त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. सुशांतला न्याय मिळावा म्हणून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होतं. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं. सुशांतला नैराश्य आल्यानं त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज लावल्यात आला होता. सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स,पीके, छिछोरे, एम॰ एस॰ धोनी द अनटॉल्ड स्टोरी अशा चित्रपटात काम केलं होतं.