पोट उघडून केलेल्या शस्त्रक्रियेनंतरही रूग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. जखमा भरून यायला वेळ लागायचा. परिणामी रूग्णालयात जास्त दिवस रहाव लागत होते. पण आता लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे ओटीपोटीला कमी छेद करावा लागत असल्याने वेदना कमी होतात. रूग्ण लवकर घरी जाऊन काही दिवसांतच कामाला पूर्वीप्रमाणे जाऊ शकतो. यामुळे ही लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया उपयुक्त ठरत आहे.
लेप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. शरीरावर मोठे छेद न करता केवळ दोन ते तीन छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. हे छेद एक ते तीन सेंटिमीटरचे असतात. लेप्रोस्कोप हा एक लांब आणि पातळ नलिकेसारखा असतो. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि उच्च-रिझोल्युशन असलेला कॅमेरा असतो. पोटावर लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घातली जातात. या साधनांच्या आणि पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात. लॅपरोस्कोपीमुळे डॉक्टरांना रूग्णाच्या शरीरातील अवयवांची खुली शस्त्रक्रिया न करताही प्रत्यक्ष तपासणी करता येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्या डॉक्टरांना बायोप्सी (पुढील तपासणीसाठी) नमुने देखील घेता येतात.
लेप्रोस्कोपि का केली जाते?
लेप्रोस्कोपि बहुतेक वेळा पोटातील किंवा ओटीपोटातील वेदनांचा स्रोत ओळखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जाते. नॉन-इन्व्हेसिव्ह पद्धती जेव्हा निदान करण्यास अक्षम असतात तेव्हा सहसा लेप्रोस्कोपि केली जाते.
लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया कधी वापरले जाते?
जगभरात सध्या रूग्णावर उपचार करण्यासाठी लेप्रोस्कोपिक तंत्राचा वापर केला जातो. लेप्रोस्कोपिक प्रक्रियेद्वारे आता बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इनगिनल हर्निया, हेपेटोबिलरी, स्वादुपिंडाचा आजार, स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. याशिवाय कोलोरेक्टल कॅन्सर, जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर व इतर अवयवांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला पटकन आराम मिळू शकतो. परंतु, प्रत्येक रूग्णाच्या वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊन लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करावी का याबाबत डॉक्टर ठरवतात.
लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया कशी केली जाते?
लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही सामान्य भूल देऊन केली जाते. या पोटाला ३ ते ४ सेंटिमीटरचा छेद केला जातो. त्यानंतर ओटीपोटीत गॅस पंप करण्यासाठी वापरण्यात येणारी ट्यूब टाकली जाते. याशिवाय कॅमेरा मार्फत ओटीपोटीतील दृश्य पाहण्यास डॉक्टरांना मदत मिळते.
लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे काही फायदे
• शस्त्रक्रियेमुळे रूग्णाचा रक्त्तस्त्राव कमी होतो
• फुफ्फुसाचे कार्य अधिक चांगले होते
• आतड्यांच कार्य योग्यपद्धतीने चालते
• शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना जाणवतात
• जखम लवकर भरून येते
• शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज भासत नाही
• रूग्णाच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होऊन तो दैनंदिन काम करू शकतो
• ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी असते