ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात धरणासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खऱ्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवत खोटे लाभार्थी उभे करून जमिनींचा कोट्यवधी रुपयांचा मोबदला परस्पर लाटण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५ गुन्हे दाखल करत ४२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथ तालुक्यातील मौजे कुशीवली गावात लघुपाटबंधारे विभागाकडून धरण उभारण्यात येणार आहे. कुशीवली लघुपाटबंधारे योजना असं या प्रकल्पाचं नाव असून यामध्ये धरणाचा पाया आणि बुडीत क्षेत्रासाठी स्थानिक शेतकऱ्यांची एकूण २१२.५ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी महसूल विभागाकडून भूसंपादन करून लाभार्थ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रक्रियेत आत्तापर्यंत १३० एकर जमीन संपादित करण्यात आली असून ८२.५ एकर भूसंपादन अद्याप बाकी आहे. या भूसंपादनासाठी १८ कोटी ७१ लाख रुपये शेतकऱ्यांना मोबदला म्हणून देण्यात येणार असून त्यापैकी २५ प्रकरणांमध्ये ११ कोटी ५१ लाख रुपये आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. मात्र यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला जमिनीचा मोबदला म्हणून एक रुपयाही मिळालेला नसून आपल्या नावाने भलत्याच कुणीतरी पैसे लाटल्याचा आरोप केलाय. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या त्यांचे आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असून त्यांचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. मात्र तरीही या मृत शेतकऱ्यांच्या नावाने खोटे दस्तावेज बनवून शासकीय मोबदला परस्पर लाटण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांनंतर उल्हासनगरचे प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी या सगळ्या प्रकरणांची चौकशी केली. यावेळी काही प्रकरणांमध्ये संशय आल्यानं त्यांनी चौकशी केली असता मृत शेतकऱ्यांच्या नावाने दस्तावेज बनवून खोटी माणसं उभी करत शासनाची फसवणूक करण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं त्यांनी याबाबत फौजदारी गुन्हा दाखल केला.