मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जात आहे. राज्य सरकारकडून योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 21 हजार 818 महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद झाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे संबंधीत महिलांना अपात्र ठरवून या योजनेतून बाद करण्यात आले आहे.
यात वयोमर्यादा, घरातील चारचाकी वाहन आणि केवायसी या कारणांवरून महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे पडताळणीत उघड झाल्याच्या कारणामुळे सर्वाधिक 49,493 महिलांना डच्चू देण्यात आला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात 66,818, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 55 हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आले. अमरावती जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 7.20 लाख अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 6.98 लाख महिलांना लाभ मंजूर झाला होता. तर उर्वरित महिलांना लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दोन कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आली आहे. तसेच आता निकषांची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी ई-केवायसीची तारीखही वाढवण्यात आली होती. मात्र तरी देखील काही महिलांनी दुर्लक्ष केले ज्यामुळे आता लाभ बंद झाल्याने महिला व बालकल्याण विभागात लाभार्थी महिलांच्या तक्रारी व येरझारा वाढल्या आहेत.