मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘कारभारी’ आणि ‘दादा’ अशी ओळख असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य हळहळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला आता ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असे नाव देण्यात यावे, अशी विनंती मिटकरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अमोल मिटकरी यांच्या मते, लाडकी बहीण ही योजना केवळ एक सरकारी योजना नसून ती अजित पवारांच्या दूरदृष्टीचा आणि कष्टाचा परिपाक आहे. जून 2024 मध्ये जेव्हा या योजनेचा श्रीगणेशा झाला, तेव्हा अर्थखात्याची धुरा सांभाळणाऱ्या दादांनीच तिजोरीवर ताण असतानाही या योजनेसाठी निधीची तरतूद केली होती. “ज्या योजनेसाठी दादांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आणि राज्यातील कोट्यवधी बहिणींच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पोहोचतील याची काळजी घेतली, त्या योजनेला त्यांचे नाव देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावना मिटकरींनी व्यक्त केल्या आहेत.
योजनेच्या प्रवासाकडे पाहिले तर सुरुवातीपासूनच ही योजना वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. कधी निधीच्या कमतरतेमुळे, तर कधी ई-केवायसी आणि नाव कपातीच्या तांत्रिक मुद्द्यांवरून विरोधकांनी रान उठवले होते. खुद्द अर्थखात्याने महसुली तूट वाढल्याचे पत्रक काढले होते, मात्र अजित पवारांनी खंबीर भूमिका घेत ‘लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही’ असा शब्द दिला होता. आज जरी अजित पवार नसले, तरी महायुती सरकारने ही योजना सुरूच राहील आणि येणाऱ्या काळात मानधनात वाढ होईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात (Plane Crash) झालेला मृत्यू हा केवळ ‘अपघात’ नसून त्यामागे मोठा ‘घातपात’ असण्याची शक्यता अमोल मिटकरी यांनी वर्तवली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी लावून धरली आहे. अपघाताच्या वेळी विमानात असलेल्या व्यक्तींच्या संख्येतील तफावत, शेवटच्या क्षणी बदललेला वैमानिक आणि विमानाची झालेली दुरवस्था यावर मिटकरींनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमोल मिटकरी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून वस्तुस्थिती समोर आणण्याची विनंती केली आहे. अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी केवळ नाव देणे पुरेसे नाही, तर त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलणे हीच त्यांच्याबद्दलची खरी निष्ठा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आता राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या नामकरणाबाबत आणि विमान अपघात चौकशीबाबत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.