मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून ओळख देणारा कमाल राशिद खान उर्फ केआरके याला मुंबई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. अंधेरी पश्चिमेतील ओशिवारा परिसरातील एका निवासी इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. केआरके याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा केआरकेला चौकशीसाठी ओशिवारा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात केआरकेने आपल्या परवानाधारक बंदुकीतून दोन राउंड फायर केल्याची कबुली दिली आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी ओशिवारा येथील नालंदा सोसायटीत घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान सोसायटीच्या परिसरातून दोन गोळ्या सापडल्या आहेत. यापैकी एक गोळी दुसऱ्या मजल्यावरून तर दुसरी चौथ्या मजल्यावरून मिळाली. पोलिसांच्या माहितीनुसार, यापैकी एक फ्लॅट लेखक – दिग्दर्शकाचा असून दुसरा फ्लॅट एका मॉडेलचा आहे. प्राथमिक माहितीनुसार, लेखक – दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा आणि मॉडेल प्रतीक बैद यांचे हे फ्लॅट असल्याचे समोर आले आहे.
सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजमधून कोणताही ठोस धागा मिळाला नव्हता. मात्र, फॉरेन्सिक तपासणीतून गोळ्या केआरकेच्या जवळील बंगल्यातून झाडल्याचे संकेत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कमाल राशिद खान म्हणजेच केआरके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून स्वतःला तो चित्रपट समीक्षक समजतो. त्याने अनेकदा बॉलिवूड चित्रपटांवर आणि कलाकारांवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. याच कारणामुळे तो वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सलमान खान, शाहरुख खान आणि अजय देवगण यांसारख्या मोठ्या कलाकारांवर केलेल्या वक्तव्यांमुळे केआरके चर्चेत राहिला असून, सलमान खानने त्याच्याविरोधात मानहानीचा दावा देखील दाखल केला होता.
चित्रपट कारकिर्दीचा विचार केला तर, केआरकेने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या वादग्रस्त ‘देशद्रोही’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाची निर्मितीही त्यानीच केली होती. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या ‘एक विलेन’ या चित्रपटात तो सहाय्यक भूमिकेत झळकला होता. सध्या मात्र, त्याच्या अटकेमुळे केआरके पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकला आहे.