कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसने लक्षणीय आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांपैकी 40 जागांचे निकाल किंवा कल समोर आले असून, त्यात काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर यश संपादन केले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी प्रत्येकी सात जागा जिंकल्या आहेत. जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला चार जागा आल्या असून, ठाकरे गटाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली आहे. या आकडेवारीनुसार आतापर्यंत काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत आहे.
दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 43 जागांचे कल स्पष्ट झाले असून, त्यामध्येही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याचे दिसते. त्यामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे काँग्रेसच्या दिशेने झुकत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या ठिकाणी भाजपचे उमेदवार नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी किर्तीकुमार मसुटे यांचा पराभव केला. सतेज पाटील गट आणि महाडिक गट यांच्यातील थेट लढतीमुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर नामदेव वाईंगडे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय नावावर केला.
उर्वरित निकालांनंतर अंतिम चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी, सध्याच्या घडीला कोल्हापूरमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर होणे अद्याप बाकी आहे.