Shivsena UBT: ठाकरे गटाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का; महत्त्वाच्या वेळी चार नगरसेवक ‘नॉट रिचेबल’?

शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात सत्तावाटपावरून संघर्ष होत असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) चे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

Shivsena UBT: ठाकरे गटाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का; महत्त्वाच्या वेळी चार नगरसेवक ‘नॉट रिचेबल’?

कल्याण: राज्याच्या राजकारणातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, आता खरी लढाई महापौर पदाच्या खुर्चीसाठी सुरू झाली आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये बहुमताचा जादुई आकडा गाठताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी राजकीय सारीपाटावर हालचालींना वेग आला असून, फोडाफोडीच्या राजकारणाची टांगती तलवार कायम आहे.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) सध्या सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना शिंदे गटाने 53 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, तर भाजपने 50 जागांवर विजय मिळवला आहे. “आमचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे आम्हीच सत्ता स्थापन करू,” असा पवित्रा घेत शिंदे गटाने महापौर पदावर आपला दावा ठोकला आहे. दुसरीकडे, “आमचा स्ट्राईक रेट सरस असल्याने आमचाच महापौर व्हायला हवा,” असा युक्तिवाद भाजपकडून केला जात आहे. सत्तेच्या या रस्सीखेचमध्ये मित्रपक्षांमधील हा वाद कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Student Group Clash : विद्यापीठात 'खुर्ची युद्ध'! कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, कुठे घडली घटना?

या सगळ्या गोंधळात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित चार नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. कोकण विभागीय कार्यालयात नोंदणीसाठी ठाकरे गटाचे 11 पैकी केवळ सात नगरसेवक दाखल झाले, तर उर्वरित चार नगरसेवकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, घोडेबाजार सुरू झाला की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोन नगरसेवक लवकरच पोहोचतील असा दावा केला असला, तरी आमदार वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत या नॉट रिचेबल नाट्याने ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे.

मुंबई महानगरपालिकेची (BMC) स्थितीही काही वेगळी नाही. मुंबईत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून मुसंडी मारली असली, तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आकडा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे मुंबईचा किल्ला लढवण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज लागणारच आहे. इथे सत्तेच्या वाटणीत कोणाचे पारडे जड राहणार आणि महापौरपद कुणाच्या गळ्यात पडणार, यासाठी आता मातोश्री आणि वर्षा बंगल्यावरून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

स्पष्ट बहुमत नसल्याने आता अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांना सोन्याचे दिवस आले आहेत. प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत असल्याने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत स्पर्धा टोकाला पोहोचली आहे. “आधी आपलं, मग मित्रपक्षाचं” या नीतीमुळे युतीत मिठाचा खडा पडणार की सामोपचाराने सत्ता वाटप होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेली ही तारेवरची कसरत राज्याच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेते, हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा: Election Inspiring Story: वडापावचा गाडा ओढणाऱ्या हातांत आता प्रभागाची धुरा; वाचा नाशिकच्या नगरसेविकेची 'संघर्षगाथा'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number