कल्याण: गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना पोरक्या असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला अखेर नवे 'धनी' मिळाले आहेत. मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या विशेष महासभेत महायुतीच्या ॲड. हर्षाली चौधरी थवील यांची महापौरपदी, तर राहुल दमले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसह केडीएमसीच्या इतिहासातील 1983 नंतरची सर्वात प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. मुंबईच्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी या ऐतिहासिक निवडीची अधिकृत घोषणा केली.
कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची मोठी उत्सुकता होती. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड केवळ औपचारिकता उरली होती. कालच्या महासभेत आयुक्त अभिनव गोयल आणि सचिव किशोर शेळके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. 1983 ते 1995 या 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय काळाचा अपवाद वगळता, 2020 पासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे तब्बल सहा वर्षे केडीएमसीवर प्रशासकाचा अंमल होता. या 'प्रशासकीय कोंडी'तून सुटका झाल्याने आता तरी नागरी प्रश्न सुटतील, अशी आशा नागरिकांमध्ये पल्लवीत झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी राजकीय गोटात मात्र दबक्या आवाजात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (UBT) गटाचे तीन नगरसेवक राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि मधुर म्हात्रे मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. विरोधकांच्या या अनुपस्थितीमुळे महायुतीचा मार्ग अधिकच सुकर झाला असला, तरी या अनुपस्थितीमागे नक्की कोणते 'राजकारण' दडले आहे, याबाबत पक्षांतर्गत पातळीवर मोठी खळबळ माजली आहे.
प्रशासकीय राजवटीचा पडदा पडल्यानंतर आता नव्या पदाधिकाऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. प्रलंबित पायाभूत सुविधा, उखडलेले रस्ते, पाणीटंचाईची समस्या आणि स्वच्छतेचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावणे, हे नवीन नेतृत्वापुढील पहिले कर्तव्य ठरणार आहे. कल्याण-डोंबिवलीकरांनी गेल्या सहा वर्षांत अनेक हाल सोसले आहेत. "प्रशासकीय राजवट संपली, आता तरी आमचे प्रश्न सुटणार का?" असा थेट सवाल सामान्य जनता विचारत आहे.
नवनियुक्त महापौर ॲड. हर्षाली चौधरी थवील आणि उपमहापौर राहुल दमले यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासाची 'कल्याणकारी' पावले कधी पडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये समन्वय साधून शहराचा कायापालट करणे, हेच या नवीन जोडीपुढचे खरे 'आवाहन' ठरेल.