काटोल: नागपूर जिल्ह्यातील काटोल नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आपली राजकीय शक्ती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्या संयुक्त उमेदवार अर्चना देशमुख यांनी 2376 मतांचे मताधिक्य मिळवून नगराध्यक्ष पदावर विजय प्राप्त केला आहे. भाजपचे दिग्गज नेते चरणसिंग ठाकूर यांचे अनेक वर्षांपासून असलेले साम्राज्य मोडीत काढण्यात देशमुखांची रणनीती यशस्वी ठरली असून, यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
काटोल नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाच्या निकालांचे विश्लेषण केले असता, येथे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. एकूण बलाबल पाहता भारतीय जनता पक्षाला 13 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीला 12 जागांवर यश मिळाले आहे.
जरी नगरसेवक संख्येमध्ये भाजप एका जागेने पुढे असली, तरी थेट जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पदावर अर्चना देशमुख यांनी विजय मिळवल्याने नगरपरिषदेच्या सत्तेचा ताबा आता देशमुखांच्या आघाडीकडे आला आहे. अनेक वर्षांपासून काटोल नगरपरिषदेवर चरणसिंग ठाकूर यांची एकहाती पकड होती, जी आता शिथिल झाली आहे.
या विजयामागे अनिल देशमुख यांनी घेतलेला एक धाडसी आणि धोरणात्मक निर्णय कारणीभूत ठरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख रिंगणात असताना शेकापच्या राहुल देशमुख यांनी निवडणूक लढवल्याने मतांचे विभाजन झाले होते, ज्याचा फायदा भाजपला झाला होता. ही चूक सुधारण्यासाठी अनिल देशमुखांनी आधीचे राजकीय वाद बाजूला ठेवून राहुल देशमुख यांच्याशी युती केली. या निर्णयामुळे त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला होता, तरीही अनिल देशमुखांनी आपल्या अनुभवाने ही आघाडी ठेवली आणि भाजपला पराभूत करण्याची रणनीती आखली.
काटोलमधील हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. चरणसिंग ठाकूर यांची काटोलवर असलेली घट्ट पकड ढिली करण्यात अनिल देशमुख यांना अनेक वर्षांनंतर यश मिळाले आहे. या विजयामुळे आगामी काळात काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ताकदीला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. अनिल देशमुखांनी कौटुंबिक विरोधाला न जुमानता घेतलेल्या या ‘मास्टरस्ट्रोक’ निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला विदर्भात नवीन उभारी मिळाली आहे.