पिंपरी, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी येथील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत हगवणे कुटुंबीयांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कस्पटे कुटुंबाच्या महिलांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर केली. 'लाडकी बहीण या नात्याने तुम्ही वैष्णवीला न्याय मिळवून द्या. जर आज दिघे साहेब असते तर त्यांनी शिक्षा दिली असती', असे कस्पटे कुटुंबाच्या महिलांनी शिंदेंसमोर म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कोणी विश्वास देखील करू शकत नाही अशी अमानवीय घटना आहे. हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरु आहे. यासाठी एसआयटी (SIT) देखील नेमली आहे. जर या घटनेत ते दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये कोणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न किंवा मदत करण्याचा देखील करू नये'.
कस्पटे कुटुंबीयांची शिंदेंकडे मागणी:
महिला: साहेब, त्यांना अजिबात सोडू नका.
एकनाथ शिंदे: अजिबात नाही सोडणार.
महिला: हगवणे कुटुंबीयांना शिक्षा झालीच पाहिजे, त्या नणंदला तर सोडूच नका. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत. ती तुमची भाची होती. तिला न्याय मिळवून द्या. साहेब, जर आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमांना काय शिक्षा दिली असती. आज आम्ही तुमच्यात दिघे साहेबांना बघतोय, तुम्ही नराधमांना शिक्षा द्या.
एकनाथ शिंदे:नक्कीच.
सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर, पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे फरार असल्याचे सांगितले जात होते. सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरकडून लग्नासाठी 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, महिन्याला जावयाला सोन्याची अंगठी आणि वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला गेला होता. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी माहेरकडून पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीला छळ करण्यात आला. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.