K Annamalai:मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेतेही प्रचारात सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे तामिळनाडूतील नेते के. अन्नामलाई यांच्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई दौऱ्यावर असताना के.अन्नामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली. “मुंबई हे केवळ महाराष्ट्राचे शहर नाही, तर आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे विधान त्यांनी केल्यानंतर, त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अनामलाईंच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे ठरवत संताप व्यक्त केला.
या टीकेनंतर आता के. अनामलाई यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणणे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांचे योगदान नाकारणे नाही, असे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली. मुंबईचा विकास, तिची आर्थिक ताकद आणि जागतिक स्तरावरील ओळख याकडे लक्ष वेधणे हा आपला उद्देश असल्याचे अनामलाई म्हणाले.
याचवेळी अनामलाई यांनी मिळालेल्या कथित धमक्यांवरही भाष्य केले. “मी धमक्यांना घाबरणारा नाही. मला जर भीती वाटत असती, तर मी राजकारणातच आलो नसतो,” असे म्हणत त्यांनी पुन्हा मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा सांगत, ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
Chennai, Tamil Nadu | Responding to MNS Chief Raj Thackeray's remarks against him, BJP leader K Annamalai says, "Who are Aaditya Thackeray and Raj Thackeray to threaten me? I am proud to be a farmer’s son. They have organised meetings just to abuse me. I don’t know whether I have… pic.twitter.com/O6QFK9ebxw — ANI (@ANI) January 12, 2026
अन्नामलाई यांनी मुंबईच्या प्रशासन आणि विकासाबाबतही मुद्देसूद भाष्य केले. बीएमसीचा अर्थसंकल्प देशातील सर्वांत मोठा असून, मुंबईसाठी सक्षम आर्थिक नियोजन करणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र, राज्य आणि महापालिका या तिन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असले, तर विकासाला गती मिळू शकते, असा दावा त्यांनी केला. यालाच त्यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असे संबोधले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेनंतर हा वाद केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. मुंबईची ओळख, महाराष्ट्राची अस्मिता आणि बाहेरील नेत्यांची भूमिका या मुद्द्यांवरून आगामी दिवसांत हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा शब्दयुद्ध प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अधिक रंगतदार ठरण्याचे संकेत देत आहे.
एकीकडे विकास आणि प्रशासनाचा मुद्दा पुढे केला जात असताना, दुसरीकडे मराठी अस्मिता आणि मुंबईवरील हक्काचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईच्या राजकारणात आणखी कोणते वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.