Tamil Nadu Politics: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपमध्ये भूकंप! एकामागून एक बड्या नेत्यांच्या एक्झिटने खळबळ

के. अण्णामलाई यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तमिळनाडू भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

Tamil Nadu Politics: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपमध्ये भूकंप! एकामागून एक बड्या नेत्यांच्या एक्झिटने खळबळ

तमिळनाडू: तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारी घटना समोर आली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाला निरोप देत स्वतंत्र राजकीय जनआंदोलन सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील भाजप संघटनेत खळबळ उडाली आहे. त्यांच्या निर्णयानंतर पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनाम्याचा मार्ग स्वीकारल्याने तमिळनाडू भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे.

के. अण्णामलाई हे गेल्या काही वर्षांत तमिळनाडूमध्ये भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जात होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. मात्र, पक्षाच्या भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी स्वतंत्र चळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा: Cockroach Janata Party: दिल्लीत आज जेन-झींचा एल्गार; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सरकारची काय भूमिका?

राजीनाम्यापूर्वी अण्णामलाई यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी अंतिम निर्णय जाहीर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना निर्णय बदलण्यासाठी प्रयत्न झाले होते; मात्र ते निष्फळ ठरले.

अण्णामलाई यांच्या बाहेर पडण्याचा परिणाम तात्काळ संघटन पातळीवर दिसू लागला. पक्षाच्या राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्य उपाध्यक्ष करू नागराजन यांनीही पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे तमिळनाडू भाजपमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अण्णामलाई यांनी ‘अण्णामलाई मक्कल इयक्कम’ या नावाने नवीन जनआंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून ते थेट लोकांमध्ये जाऊन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राजकारण सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. उलट, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

हेही वाचा: K. Annamalai: तमिळनाडूच्या राजकारणात 'सिंघम'चे नवे वादळ; अण्णामलाईंचा भाजपला रामराम, नव्या पक्षाची घोषणा

भाजपने तमिळनाडूमध्ये स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका अण्णामलाई यांनी अनेकदा मांडली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका कोणत्याही पक्षाशी युती न करता लढण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी त्यांचे मत जुळले नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विशेष म्हणजे, नवीन चळवळीला सुरुवात होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘अण्णामलाई मक्कल इयक्कम’मध्ये सहभागी होण्यासाठी हजारो स्वयंसेवकांनी नोंदणी केल्याची माहिती अण्णामलाई यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

आगामी काळात अण्णामलाई यांची नवीन राजकीय चळवळ तमिळनाडूच्या राजकारणात किती प्रभाव निर्माण करते आणि भाजपमधील असंतुष्ट गट कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयामुळे तमिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number