नुकत्याच राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूका पार पडल्या ज्यात महायूतीचा दणक्यात विजय झाला. अशातच निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे गाडीतून फरफटत नेत अपहरण झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या सिडको परिसरात सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास जीवन घोगरे पाटील हे चारचाकी वाहनातून काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यावेळेस एका अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाडीतून फरफटत नेत त्यांचे अपहरण केले. एवढेच नव्हे तर त्यांना एका अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण देखील केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यांना केलेल्या मारहाणीमुळे ते गंभीर जखमी झाले. दरम्यान सुदैवाने जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरणानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर ते स्वत: नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करून आले आहेत. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सिडको भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
जीवन घोगरे पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकरणामुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. तसेच अपहरणकरत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.