नागपूर: राज्यातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, आर्थिक घसरण आणि सरकारच्या अपयशी धोरणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी पुणे, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. जयंत पाटील यांनी पुण्याच्या स्थितीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुंडगिरी, गँगवॉर आणि खंडणीसाठी ओळखले जात असल्याचे ते म्हणाले.
पुणे शहरात व्यवसाय करणे अवघड झाले असून, शिक्षणासाठी आलेल्या मुलींनाही सुरक्षितता उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून एफआयआर नोंदवली जात नसल्याने पीडितांनाच संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पुण्यातील नवले ब्रिजला ‘मृत्यूचा सापळा’ असल्याचे म्हटले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याविषयी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेचा निषेध करत, सभागृहाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले. संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा भाषेला स्थान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भाच्या प्रश्नांकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षावरही जयंत पाटील यांनी बोट ठेवले. 1953 च्या करारानुसार विदर्भातील प्रश्नांसाठी दरवर्षी सहा आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचे वचन देण्यात आले होते, मात्र आता हे अधिवेशन केवळ एका आठवड्यापुरते मर्यादित झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही विदर्भावर सखोल चर्चा न झाल्याने हा विदर्भाच्या जनतेचा अवमान असल्याचे ते म्हणाले.
सरकारने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे जनतेत मोठा असंतोष असल्याचा आरोप त्यांनी केला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे, महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिला पोलिसांची भरती, शेतकऱ्यांची कर्जमाफी याबाबत प्रत्यक्षात किती अंमलबजावणी झाली, याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“महाराष्ट्र आता थांबणार नाही” या घोषणेचा प्रवास आता “महाराष्ट्रात हे कधी थांबणार” इथपर्यंत आल्याची टीकाही त्यांनी केली. राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना जयंत पाटील यांनी वाढत्या कर्जबोज्याकडे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक बाहेर गेली असून लाखो नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्थानिक उद्योग, हस्तकला आणि सांस्कृतिक ठेवा जपण्याची गरज व्यक्त करत, कोल्हापूरप्रमाणे पुण्यालाही उच्च न्यायालयाचे खंडपीठ मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. गुंडांना सवलती मिळत असताना सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांमध्ये आरोपी न पकडले जाणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.