राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या एका नेत्याने केलेल्या 'गुंगी गुडिया' या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या वादावर आता सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत दोन इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्या आहेत. जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्यावर झालेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत, हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून स्वतःच्या कर्तृत्वावर समाजात स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला आघात असल्याचे म्हटले आहे.
आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निविवाद राहिलाच पाहिजे. राजकारणात विजय-पराजय होत राहतात, सत्ता बदलत राहते; पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, कोणत्याही नेत्यापेक्षा आणि कोणत्याही राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे प्रत्येक विधान केवळ निषेधार्हच नाही, तर लोकशाही संस्कृतीलाही काळिमा फासणारे आहे.
पुढे त्यांनी लिहिले की, "माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे. माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात; परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरूर असावेत; पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत".