जळगाव: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. 15 जानेवारीला मतदान असल्याने सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. जळगावच्या धरणगाव येथील प्रचार सभेत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास गावरान आणि मिश्कील शैलीत विरोधकांचा समाचार घेतानाच, स्वकीयांनाही कानपिचक्या दिल्या. "निवडून आलो म्हणजे आपण सर्वांचे झालो, त्यामुळे विरोधकांनाही पाणी पाजा," असा सल्ला त्यांनी आमदार किशोर पाटील यांना दिला.
जुन्या अनुभवांचा दाखला सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नसल्याचे संकेत दिले. पाचोरा आणि भडगावच्या मागील नगरपरिषद निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, "किशोर पाटील भाजपसोबत युती करणार नाहीत हे मला ठाऊक आहे. गेल्या वेळी युती तोडून त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि भाजपचा पराभव करत दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवला होता." या विधानामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
सत्तेतील मर्यादांवर मिश्कील भाष्य आपल्या आक्रमक भाषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटलांनी यावेळी सत्तेत राहिल्याने येणाऱ्या मर्यादांवर मिश्कील टिप्पणी केली. "मला आता पूर्वीसारखं मोकळं बोलता येत नाही, कारण मी सरकारमध्ये आहे. मला सर्वांसोबत 'आय लव्ह यू' करावं लागतं आणि जबाबदारीने शब्द वापरावे लागतात," असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. मात्र, किशोर पाटील यांना अशी कोणतीही मर्यादा नसल्याने ते सध्या दंड थोपटत आहेत, असेही त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले.
गुलाबराव पाटलांनी आपल्या राजकीय प्रवासातील 1996 मधील एक रंजक किस्साही शेअर केला. "धरणगावचा पहिला नगराध्यक्ष बसवताना आमच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत मी नगरसेवकांना घेऊन झुरखेड्याला पळून गेलो होतो. एका कार्यकर्त्याच्या वाड्यात तब्बल 16 दिवस नगरसेवकांना ठेवून मगच नगराध्यक्ष बसवला होता," अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच धरणगावची 25 वर्षांची सत्ता सध्या गेली असली, तरी ती पुन्हा नक्की येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"दोन मोबाईल आणि चार माणसं आली की हवा लागते" निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींचे वागणे कसे बदलते, यावर गुलाबराव पाटलांनी कडक शब्दात टीका केली. "नगरसेवक झाले की दोन मोबाईल, चार माणसं सोबत आली की काही जणांना हवा लागते. जे मतदार डोक्यावर घेतात, त्यांनाच नंतर खाली पटकतात, असं करू नका," असा सल्ला त्यांनी दिला. काम होवो न होवो, पण समोरच्याशी गोड बोला, असा माणुसकीचा धडा त्यांनी भावी नगरसेवकांना दिला.
किशोर पाटलांच्या नशिबाचा उल्लेख आमदार किशोर पाटील यांच्या राजकीय प्रवासावर बोलताना गुलाबराव म्हणाले की, किशोर पाटील पूर्वी पोलिस दलात होते. "कधीकाळी ते आमदाराच्या सुरक्षेसाठी पिस्तूल घेऊन मागे उभे राहिले असते, पण नशिबाने ते आज स्वतः आमदार झाले आहेत," असे सांगत त्यांनी किशोर पाटलांच्या प्रवासाचे कौतुक केले. या सभेतील गुलाबराव पाटलांच्या भाषणाची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे.